मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. काल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन दिलं होतं, या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं बोललं जात आहे. आजच्या बैठकीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी आणि एनपीआरच्या विषयांवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. याबैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित होते.


दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायद्यासंदर्भात भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी बोट ठेवल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली. सीएए आणि एनआरपीला विरोध नसल्याने उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बोलताना स्पष्ट केलं. तर एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या अशा भूमिका मांडणं चुकीचं असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत सीएए, एनआरसीवर चर्चा झाली. या विषयी सामनाच्या माध्यमातून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. सीएएला घाबरण्याची गोष्ट नाही. एनआरसीवर संसदेत भूमिका स्पष्ट केली आहे. ते फक्त आसाम पुरतं मर्यादित आहे. एनआरसी हा फक्त आसाममध्येच लागू होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी केलेल्या चर्चेनंतर दिली आहे. तर एनपीआर हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याला विरोध नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.