Guthka king J M Joshi : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibmrahim)पाकिस्तानात गुटख्याचा कारखाना सुरू करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली गुटखा व्यापारी जे.एम. जोशी यांच्यासह जमिरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी उर्फ फारुख तालका यांना दोषी ठरवलं आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या तिघांना 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. याप्रकरणी गोवा गुटखाचे मालक जे. एम. जोशी यांच्यासह माणिकचंद गुटखाचे मालक रासिकलाल धारिवाल हे देखील आरोपी होते, परंतु धारीवाल यांचं खटल्या दरम्यानच निधन झाल्यानं त्यांच्यावरील खटला थांबवण्यात आला होता. 


दाऊदनं साल 2002 मध्ये पाकिस्तानात गुटखा उत्पादन सुरू करण्यासाठी या दोन्ही गुटखा मालकांकडे मदत मागितली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दाऊदच्या गुटखा उत्पादन कंपनीला 'फायर गुटखा कंपनी' असं संबोधलं जाणार होतं. त्यावेळी जोशी यांनी कथितपणे सारी जबाबदारी घेऊन प्लांट कार्यान्वित करण्यासाठी 2 कोटी 64 लाख रुपये किंमतीची पाच मशीन दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवली होती. मात्र, पुढे धारिवाल आणि जोशी यांच्यात पैशांवरून वाद झाला आणि जोशी यांनी गोवा गुटखा सुरू केला होता. अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी कोर्टाला दिली.


 जोशी यांच्याकरता केली गेली कमी शिक्षेची मागणी  


जोशी यांनी देशातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि कोट्यवधी रुपयांचा महसूलही सरकारला मिळवून दिला होता. तसेच त्यांची इतर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती जोशी यांच्यावतीने अँड. सुदीप पासबोला यांनी केली. मात्र, जोशींच्याविरोधात दाखल गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असून जोशींना जीवाची भीती वाटत होती तर त्यांनी दाऊदऐवजी पोलिसांकडे मदत मागणं अपेक्षित होत. असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. त्यांची ही बाजू ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी जोशी यांच्यासह आरोपी जमिरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी उर्फ फारुख तालका यांना दोषी ठरवून 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड ठोठावला.


ही बातमी देखील वाचा