मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेत हळदणकर कुटुंबियांनी एकुलता एक आधारस्तंभ गमावला. सरकारनं मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत केली मात्र, ती मदत हळदणकर कुटुंबाला आयुष्यभर पुरणारी नाही. त्यामुळे मयुरेशच्या बहिणीला सरकारी नोकरी मिळावी यासाठी वरळीकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


29 सप्टेंबरला एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबीयांनी आपल्या काळजाचा तुकडा गमावला.

वरळीच्या 80 नंबरच्या बीडीडी चाळीत छोट्याशा खोलीत मयुरेश हळदणकर कुटुंबासोबत राहायचा.

घरात तीन-चार लोक मोठ्या मुश्किलीनं झोपतील एवढीच जागा. वडिलांना नोकरी नाही. आईचं सततचं आजारपण. हळदणकर कुटुंबाचा गाडा एकट्या मयुरेशच्या छोट्या खांद्यावर होता.

मयुरेशनंतर आता कुटुंबाची जबाबदारी त्याच्या बहिणीवर आली आहे. तिला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी आता हळदणकर कुटुंब आणि समस्त वरळीकर करत आहेत

एल्फिस्टनच्या दुर्घटनेनंतर राजकारण चांगलाच तापलं आहे, आरोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. जनतेमध्ये संताप आहे पण हळदणकरांसारख्या अनेक कुटुंबीयांचा आधार गेला त्याचं पुढे काय? हा प्रश्न अनुउत्तरीतच आहे.