मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत आमंत्रण दिलं आहे, अशी माहिती राणेंनी बैठकीनंतर दिली.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएत येण्याबाबत अधिकृत आमंत्रण दिलं आहे. माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे", असे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले.

मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. अखेर राणे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांशी अर्धा तास चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

नारायण राणे हे एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबाबत राणेंच्या पक्षस्थापनेपासून जोरदार चर्चा सुरु आहे. आता नारायण राणे दोन दिवसात काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, “नारायण राणेंच्या पक्षाची धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील, तर त्यांचं एनडीएत स्वागत करु.”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल म्हटले होते. त्यामुळे नारायण राणे एनडीएत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.