मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. याआधी मुंबई तुंबलीच नाही, असं वादग्रस्त वक्तव्य महापौरांनी केलं होतं आणि आता तर महापौरांचा निषेध करणाऱ्या एका महिलेचा त्यांनी चक्क हात पिरगळला आहे. महापौर एवढ्यावरच थांबरले नाहीत तर त्यांनी त्या महिलेला धमकीदेखील दिली असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


सोमवारी (05 ऑगस्ट) पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ सांताक्रुझ पूर्व येथील पटेल नगरमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना स्थानिकांनी घेरलं होतं. या परिसरात तब्बल 72 तास पाणी तुंबलं होतं. मात्र, एकही लोकप्रतिनिधी येथील परिस्थिती सावरण्यास आला नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष होता. त्यातच, याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे विजेचा धक्का लागून एकाच घरातील दोघांचा (आई-मुलाचा) मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी महापौर, आमदार तृप्ती सावंत, स्थानिक नगरसेविका प्रज्ञा भुतकर यांच्यासह या परिसराची पाहणी कर‌ण्यासाठी गेले. परंतु स्थानिकांनी त्यांना परिसरात येण्यापूर्वीच रोखलं. आता तुमची गरज नाही, असे म्हणत स्थानिक महिलांनी महापौरांना चहुबाजूंनी घेरलं.

परंतु, यावेळी महापौरांनी आपल्या पदाचं भान विसरत स्थानिकांसोबत अरेरावीची भाषा सुरु केली. महापौरांची स्थानिकांसोबतची अरेरावी एका व्हिडीओद्वारे समोर आली आहे. या व्हिडीओत महापौर एका महिलेचा हात पिरगळताना दिसत आहेत.

दरम्यान, यावेळी महापौरांनी मला ओळखत नाहीस का तू? मी कोण आहे ते माहीत नाही का? नालायकपणा करु नको, दादागिरी चालणार नाही. असे म्हणत महापौर स्थानिकांना धमकावत होते. या व्हिडीओमुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांविरोधातला स्थानिकांमधील संताप आणखीनच वाढला आहे.

व्हिडीओ पाहा



व्हिडीओ पाहा