मिरारोड : काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना अवघ्या 29 व्या वर्षी वीरमरण आलं. कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर आज साडेबारा वाजण्याच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मिरारोड येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 'कौस्तुभ राणे अमर रहे'च्या घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही कौस्तुभ यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत राणे कुटुंबीयांचं सांत्वन केलं.


मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील असलेले कौस्तुभ राणे हे मीरारोड येथील रहिवासी होते. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.


उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवादी एलओसी (नियंत्रण रेषा) पार करुन घुसखोरी करणार असल्याची माहिती 7 ऑगस्टच्या रात्री उशिरा सैन्याला मिळाली होती. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग हे जवान शहीद झाले.


मिरारोड भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपलं शिक्षण घेतलं होतं. कौस्तुभ यांच्या घरातील कोणीही लष्करात नव्हते. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत कार्यरत होते, तर आई ज्योती राणे मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या उत्कर्ष मंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आहेत. सध्या दोघेही निवृत्त आहेत.


कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका मुलाला घेऊन गावी गेल्या होत्या तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते. मात्र कौस्तुभ यांच्या शहीद झाल्याच्या वृत्ताने राणे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आलं होते. कौस्तुभ यांच्या सैन्यातील कामगिरीबद्दल राणे कुटुंबियांसह मीरा रोड परिसरातील रहिवाशांनाही खूपच अभिमान होता.