मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा 23 जुलैला गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनाचं औचित्य साधत, मराठा मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
दादर मार्केट बंद
नवी मुंबई एपीएमसी मार्केट ज्या पद्धतीने बंद आहेत त्याच प्रमाणे दादरमधील फूल आणि भाजी मार्केटही बंद ठेवण्यात आलं आहे. हा बंद कुठल्याही दबावाखाली करण्यात आलेला नसून, उत्स्फूर्तपणे पुकारलेला हा बंद असल्याचे दादरमधील भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्रतील भाजी मंडईतील हा पहिला बंद आहे जो स्वयंपूर्तीने करण्यात आला आहे. सकाळपासून दादरमध्ये कुठल्याच भाज्यांची आवक झालेली नाही. दिवसाला भाज्यांचे 50-60 ट्रक दादरमध्ये भाजी मार्केटमध्ये येतात. पण आज कोणतेही ट्रक आलेले नाहीत.
शाळा-महाविद्यालये सुरु
मराठा सकल समाजाने पुकारलेल्या या बंदचा कोणताही परिणाम शाळा-महाविद्यालयांवर झालेला नाही आहे. मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरु आहेत.
रेल्वे वाहतूक
मुंबई बंदचा लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईतील सर्व लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.
रस्ते वाहतूक
मुंबईतील बस सेवा, टॅक्सी सेवा, ओल-उबर सेवा यांवर कोणताही परिणाम झाल नाही आहे. तसेच शहरातील रस्ते वाहतूक सुरुळीत सुरु आहेत. पण मुंबई बंदचा परिणाम एसटी बसेसवर झालेला दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील एकही एसटी बस शहराच्या बाहेर जात नाही आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
मुंबईतील मराठा आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसून आले. काही कार्यकर्त्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी ठिय्या आंदोलन करुन सरकारविरोधात रोष व्यक्त करणार आहेत. मुंबईमध्ये काही मराठा संघटनांच्यावतीने सकाळी 11 वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.