मुंबई : सासरच्या मंडळींनी टोमणे मारणे किंवा उपहासात्मक बोलणे हा वैवाहिक आयुष्याचाच एक भाग आहे, अशा निरिक्षणासह नुकतंच मुंबई सत्र न्यायालयाने मलबार हिल स्थित एका दाम्पत्याला अटकेपासून संरक्षण दिलं. त्यांच्या सुनेनं ८० वर्षीय सासरे कांतीलाल गुप्ता आणि ७५ वर्षीय सासू मालती गुप्तात्यांच्यावर हे आरोप केले होते.
काय होतं प्रकरण?
सदर 30 वर्षीय महिलेनं सध्या दुबईमध्ये असणाऱ्या तिच्या शालेय मित्राशी 2018 मध्ये विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय़ घेतला होता. पण, लग्नाच्या काही दिवसांपूर्वी या नात्याची कायदेशीर नोंदणी करण्यासाठी म्हणून कागदपत्रांची जमवाजमव करत असलाना सदर महिलेला आपला पती हा घरकाम करणाऱ्यांचा मुलगा असून, आपल्या होऊ घातलेल्या सासू- सासऱ्यांनी त्याला दत्तक घेऊन मोठं केल्याची बाब समोर आली.
आरोपांमध्ये नेमकं काय?
महिलेनं आपल्या सासऱच्यांवर केलेल्या आरोपांमध्ये त्यांच्याकडून कधीही काहीच भेट आपल्याला दिली गेली नसल्याचं तिनं सांगितलं. आपल्या आई- वडिलांनीच दीड कोटी रुपये किंमतीचे दागिने दिल्याची नोंद तिनं केली. घरातील फ्रिजला हात न लावणं, लिविंग रुममध्येच राहणं, माहेरी न जाणं असे नियम तिच्यावर लादण्यात आले. जेव्हाजेव्हा तिनं याबाबत पतीला माहिती देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानंही तिच्याकडून आपल्या पालकांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे याच आशयाचं वक्तव्य केलं. इतकंच नव्हे तर, दुबईहून परतत असताना तिच्या पतीनं तिला 15 किलो सुका मेवा दिला होता. तो ज्यावेळी ती सासरी देण्यास गेली तेव्हा तिच्या सासूनं या सुक्यामेव्याचं वजन केलं होतं, असंसुद्धा या महिलेनं आरोप करताना म्हटलं होतं.
दरम्यान, सासू- सासऱ्यांच्या वकिलांच्या माहितीनुसार सदर महिलेला तिचा पती दत्तक पुत्र असल्याची कल्पनाही होती आणि ती सासरच्या घरी लग्नानंतर फक्त दहा दिवस राहिली होती. लग्नाचा खर्चही दोन्हीकडच्या मंडळींकडून एकसारख्या प्रमाणातच केला गेल्याची माहिती त्यांनी दिली. किंबहुना आपल्या अशीलांना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरची माहितीच नव्हती असं सांगत त्यांच्या खात्यांतील व्यवहार ठप्प झाले तेव्हा ही बाब समोर आल्याचं वकिलांनी स्पष्ट केलं. शिवाय सुनाचे दागिने त्याच्याकडे अल्याची बाबही त्यांनी फेटाळली.
परतीच्या वाटा बंद; बीसीसीआयनं नाकारली युवराजची मागणी
यावर न्यायालय काय म्हणालं?
आरोपकर्त्या महिलेनं केलेले हे आरोप पाहता या सहज होणाऱ्या गोष्टी आहेत, असंच त्याचं विश्लेषण करण्यात आलं. विशेष न्यायमूर्ती माधुरी बरालिया यांनी, '(सूनेला) सासू- सासऱ्यांना उपहासात्मक बोलणं आणि टोमणे मारणं हा वैवाहिक जीवनाचाच एक भाग आहे. सर्वच कुटुंबांमध्ये हा प्रकार घडतो. त्यामुळं 80 आणि 75 वर्षांच्या या सासू - सासऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येऊ नये', असा निर्णय़ सुनावला.
न्यायालयानंही सादर केल्या अटी..
अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर सुनावणी करतेवेळी न्यायालयानं या दाम्पत्याला आपले पासपोर्ट पोलिसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर किंवा न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाण्ची मुभा नसेल.