ठाण्यात शिवसेनेच्या शाखा संघटकाला मारहाण, शिवसैनिकांचं ठिय्या आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2017 10:21 AM (IST)
ठाणे : ठाण्यात शिवसेनेच्या शाखा संघटक संध्या चिंदरकर यांना कुख्यात गुंड मयूर शिंदेनं मारहाण केली आहे. ठाण्यातील शिवसैनिकांनी मयूर शिंदेवर मारहाणीचा आरोप करत पोलिसात धाव घेतली आहे. शनिवारी रात्री ही मारहाण करण्यात आल्याचा शिवसैनिकांनी आरोप केला आहे. ठाणे शहरातील शाखा संघटक संध्या चिंदरकर यांना मारहाण झाल्याचं समजताच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के इत्यादींनी वर्तकनगर पोलीस स्टेशनला धाव घेतली. शाखा संघटक चिंदरकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं. ठिय्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी आरोपी मयूर शिंदे व त्याच्या गुंडांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरा पोलिसांच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.