मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे (Flood) मोठं नुकसान झालं असून बळीराजाच्या डोळ्या अश्रूंच्या धारा आहेत. बळीराजाचे हेच अश्रू पुसण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत. अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे असेही ते म्हणाले.
शिवसेना आमदारही पगार (Shivsena MLA donate salary)
उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार-खासदार हेही आपला एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे, महायुतीमधील दोन पक्षांनी पूरग्रस्तांसाठी 1 महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. आता, भाजपच्या भूमिकडे सर्वांकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महारष्ट्र शासनातील राजपत्रित अधिकारी आपलं एक दिवसाचे वेतन राज्यातील पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे यांनी ही माहिती दिली.
अन्नधान्य वाटपास सुरुवात - भुजबळ (Chhagan bhujbal for flood relief)
दरम्यान, राज्यातील पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 2654 कुटुंबाना मदत केली आहे. साडेसव्वीस मेट्रिक टन गहू तांदूळ दिला आहे, आमच्या विभागाकडून अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. केंद्राची मदत 100 टक्के येईल, संकट एवढं मोठं आहे की मदतीची वाट न बघता बांधीत लोकांना मदत करायला सरकार पुढे येईल. पंचनामा झाल्यानंतर किती मदत द्यावी हे स्पष्ट होईल, असेही भुजबळ यांनी म्हटले. पहिल्या टप्प्यात मदत केली आहे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असा पाऊस यापूर्वी आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. ढगफुटी अनेक ठिकाणी होतं आहे, ग्लोबल वॅार्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. पाऊस पडत नाही तर कोसळतोय. त्यामुळे, टाऊन प्लॅनिंग करताना विचार व्हायला हवा, असेही भुजबळ यांनी म्हटले.
हेही वाचा
सोलापूर-पुणे महामार्ग बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवानगी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले