मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ईशान्य मुंबईत (North East Lok Sabha Constituency)  मराठी विरुद्ध गुजराती असा वाद (Marathi VS Gujarati) पाहायला मिळतोय. ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांना गुजराती रहिवासी राहत असलेल्या सोसायटीमध्ये प्रचार करण्यास थांबवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गटाचे पदाधिकारी घाटकोपर पश्चिम भागांत प्रचार करत होते. मात्र या भागातील गुजराती रहिवासी असलेल्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी जात असताना त्यांना थांबवलं आणि आत प्रचार करु नका असं सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर अशा प्रकारचा गुजराती आणि मराठी वाद काही नसल्याचं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं.  

Continues below advertisement

घाटकोपरमधील गुजरातीबहुल सोसायटीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे. घाटकोपर पश्चिममध्ये असलेल्या समर्पण सोसायटीतील लोकांकडून मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचार करायला दिला नाही, तर भाजपची याच ठिकाणी बैठक लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. 

पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिला. पण त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत रंगताना दिसत आहे. 

Continues below advertisement

ठाकरे गटाचे शाखाप्रमुख प्रदीप मांडवलकर म्हणाले की, मराठा माणसाला या ठिकाणी प्रचाराला परवानगी नसल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यामुळे मराठी आणि गुजराती असा वाद निर्माण केला जात आहे. तर भाजप नेते भालचंद्र शिरसाठ यांनी महाविकास आघाडीच्या पायाखालील वाळू सरकल्याने असे भाषिक वाद पेटवले जात असल्याचा आरोप केला आहे.

या वादावरून खासदार संजय राऊत म्हणाले की, आमची शिवसेना खरी म्हणणारे शिंदे गटाची यावर काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी. या ठिकाणी मराठी माणसाला दुय्यम वागणूक दिली जात आहे. 

सोसायटीचे पदाधिकारी काय म्हणाले? 

या बाबत समर्पण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आरोप खोडून काढले आहेत.या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधी वेळ घेऊन बैठक ठेवली होती. त्यामुळे आम्ही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नंतर येण्यास सांगितले. आमच्या सोसायटीमध्ये सर्व प्रांताचे लोक राहतात, त्यामुळे असा वाद नको.

मुंबईत आणि मु्ख्यतः घाटकोपरमध्ये गेल्या काही महिन्यात मराठी विरुद्ध गुजराती असा वाद वारंवार होत आहेत. अशात एन निवडणुकीत हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा :