'त्या' चौघांची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2018 01:34 PM (IST)
कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून 50 हजार रुपयांचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आणखी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली आहेत. आरोपींची माहिती पोलिसांना देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनाम जाहीर करण्यात आलं आहे. 'आपल्याला या नराधम लोकांबद्दल काही माहिती असेल तर अवश्य द्या. अत्यंत निर्घृणपणे एका निरागस, निष्पाप व्यक्तीची यांनी हत्या केली आहे' असा मथळा लिहून मराठा युवा क्रांतीकडून रोख 50 हजार रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चलचित्रं जारी केली. या आरोपींबद्दल माहिती देण्याचं आवाहन सीआयडीने केलं आहे. आरोपींची कबुली विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे तिन्ही आरोपी अहमहनगरमधील आहेत. 10 जानेवारी दिवसभराच्या कारवाईनंतर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. 11 जानेवारीपर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 51 वर पोहोचली होती. राहुल फटांगडेच्या कुटुंबीयांना मदत 1 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक संघटनांकडून मृत राहुलच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राहुल फटांगडेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली.
कुटुंबाकडून शांततेचं आवाहन महाराष्ट्रवासियांनो फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा विसरु नका अशी संयमी भूमिका भीमा-कोरेगावच्या हिसांचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली. घरातील पाण्याचा नळ आणण्यासाठी बाहेर पडलेल्या राहुल फटांगडेचा भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात हकनाक बळी गेला. मात्र, तरीही राहुलच्या कुटुंबाने शांतेतचं आवाहन केलं आहे. दरम्यान, समाजातील लोकांनी एकमेकांना समजून घेतलं तर दंगली घडणार नाही, असंही मत त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केलं. नेमकं प्रकरण काय? 1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला होता. या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. संबंधित बातम्या :