हिंदमाताजवळही मॅनहोल उघडं, 'झाकणचोरीं'समोर पालिका हतबल
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2018 11:28 AM (IST)
मॅनहोल्सची झाकणं चोरीला जात असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.
मुंबई : मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून ऐन पावसाळ्यात मुंबईतील अनेक मॅनहोल्स उघडी दिसत आहेत. मात्र या मॅनहोल्सची झाकणं चोरीला जात असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. माटुंग्यात फाईव्ह गार्डनजवळ मॅनहोलचं झाकण चोरीला गेल्याचा प्रकार काल उघडकीस आला, तर दुसरीकडे आज हिंदमाता ते सायन दरम्यान असलेल्या रस्त्यावरचे मॅनहोल रात्रीपासून उघडेच आहे. यामुळे दोन वाहनांचा अपघात झाल्याची माहिती आहे. वॉर्ड अधिकारी या प्रकरणी पोलिसात तक्रार करणार आहेत. या मॅनहोलचं झाकण चोरीला गेल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. या परिसरात पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. याच भागापासून काही अंतरावर गेल्या वर्षी डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.