मुंबई : विधानसभा निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त वॉर्डमध्ये भाजपला बहुमत मिळालं, याचं भान शिवसेनेला आहे का?, असा सवाल करत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. शिवाय, आमच्या मित्रपक्षाने ज्ञान आणि भान दोन्ही ठेवलं पाहिजे, असा टोलाही किरीट सोमय्यांनी सेनेला लगावला.
"विधानसभा निवडणुकीत घाटकोपर ते मुलुंडदरम्यान शिवसेनेचे काही आमदार निवडून आले. मात्र, 24 पैकी 21 वॉर्डात भाजप पहिल्या क्रमांकावर आहे, याचं भान शिवसेनेने ठेवावं.", असे खासदार किरीट सोमय्या म्हणाले.
"मुंबईला माफियामुक्त करण्यासाठी आमचा लढा आहे. मुंबईला खड्डेमुक्त आणि माफियामुक्त करायचंय आणि मुंबईला माफियामुक्त करयचं असेल, तर सोबत यावंच लागेल. मग ते आधी काय किंवा नंतर काय.", असेही यावेळी खासदार सोमय्या म्हणाले.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अद्याप एकही बैठक झाली नाही. त्याआधीच भाजप नेते आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. गेले काही दिवस शिवसेनेविरोधात काही प्रमाणात शांत बसलेले भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, खासदार किरीट सोमय्या यांच्या विधानावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सोमय्या यांच्या टीकेआधी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.