कल्याण : कल्याण शहरात सध्या सापांचा सुळसुळाट झाला आहे. यामागे डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
कल्याण शहरातल्या डम्पिंग ग्राउंडला लागून मोठ्या खाडी आणि झाडांचा परिसर असल्याने या भागात सापांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यातच डम्पिंग ग्राऊंडला मागील आठवडाभरापासून आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या उष्णतेमुळे येथील साप आता मानवी वस्तीत घुसू लागले आहेत.
अशाप्रकारे मागच्या चार दिवसात ८ ते १० विषारी साप वाडेघर, रौनक सिटी, आधारवाडी परिसरातून पकडण्यात आले आहेत. मात्र यामुळे चांगलीच नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
दरम्यान, आपल्या परिसरात जर साप आढळला, तर त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांना संपर्क साधण्याचं आवाहन कल्याणमधील सर्पमित्रांनी केलं आहे.