मुंबई : लॉकडाऊनमध्ये मुंबईत ज्याप्रमाणे इतर राज्याचे लोक अडकलेत तसेच राज्याच्या अंतर्गत रहाणाऱ्या मुंबईत रोजगार साठी आलेले देखील अनेक कुटुंब अडकून पडली आहेत. मुंबईत नंदी बैलाचा खेळ करण्यास दरवर्षी शेकडो कुटुंब येत असतात. चार पाच महिने मुंबईत राहून पुन्हा आपले नंदी बैल घेऊन गावाकडे जात असतात. यंदा मात्र कोरोनामुळे काही दिवस लॉकडाऊन केला आहे. अशात हातावर पोट असलेली ही नंदी बैलाचा खेळ करणारी कुटुंब मुंबईतच अडकून पडली आहेत.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील नंदी बैलाचा खेळ करणारी काही कुटुंबं सध्या वांद्र्याच्या खैरवाडी परिसरात कसेबसे आलेले दिवस पुढे ढकलत आहेत. एकीकडे लॉकडाऊन असल्याने मुंबईत नंदी बैल घेऊन फिरता येत नसल्याने एक रुपयांचेही उत्पन्न नाही. त्यात आता गावाने देखील त्यांना मुंबईत असल्याने गावात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या नंदी बैलांसह ही कुटुंब मुंबईत अडकून पडली आहेत.
सध्या काही सामाजिक संस्था या कुटुंबाना दोन वेळचे जेवण देतात. बैलांसाठी मिळेल तिथून चारा शोधा शोध सुरू आहे. या स्थितीमध्ये आता दिवस काढावे तरी कसे? असा प्रश्न या कुटुंबांसमोर आहे.
सध्या या कुटबांची मोठी परवड होते आहे. उघड्यावर राहणे, उघड्यावर जेवण बनवणे आणि उघड्यावरच मुलांना ही सांभाळावं लागत आहे. यात सर्वाधिक तारांबळ या कुटुंबांतील महिलांची होत आहे. सरकारने आमची गावाला जाण्याची व्यवस्था करावी आणि गावानेही आमचा स्वीकार करा अशी मागणी हे नंदीबैलवाले करत आहेत.
इतर राज्यातील कामगार त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था सरकार आणि प्रशासनाने केली असली तरी राज्यातल्या राज्यात अडकलेली अशी हातावर पोट असणारी शेकडो कुटुंब मुंबईसह राज्यातील अनेक शहरात अडकून पडली आहेत. त्यांच्याबाबत सरकार कधी निर्णय घेणार याकडे या कुटुंबांचे लक्ष लागलेले आहे.
नंदीबैलाचा खेळ करणारी अनेक कुटुंब मुंबईत अडकली, बैलांच्या चाऱ्यासह पोटापाण्याचा सवाल
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
08 May 2020 12:05 PM (IST)
नंदीबैलांसाठी मिळेल तिथून चारा शोधा शोध सुरू आहे. या स्थितीमध्ये आता दिवस काढावे तरी कसे? असा प्रश्न या कुटुंबांसमोर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -