Manoj Jarange Patil Maratha Protester BSE मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकरांची कोंडी होतेय.
आज सकाळपासून सीएसएमटी परिसरात कमालीची गर्दी झालीय. एकीकडे सर्वसामान्य मुंबईकर ऑफिस गाठायचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे आंदोलकांनी सीएसएमटीवर गर्दी केलीय. तसेच आंदोलकांकडून नृत्यही सुरू आहे. दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी मराठा आंदोलक जात आहे. त्यातच आज काही आंदोलकांनी शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
आम्हीही शेअर होल्डर, आम्हीही शेअर मार्केट बघणार-
शेअर मार्केटच्या परिसरातले काही व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये काही आंदोलक शेअर बाजारच्या इमारतीमध्ये घुसत होते. यावेळी त्यांना सुरक्षारक्षकांकडून अडवण्यात आले. यानंतर आम्ही शेअर होल्डर आहोत. आम्हाला शेअर मार्केटचं कार्यालय बघण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचे पैसे गेले आहेत, असं मराठा आंदोलक म्हणाले. आमच्या आंदोलनामुळे काहीही परिणाम होऊ शकतं, म्हणून आम्ही मार्केटची स्थिती बघण्यासाठी आलो होतो, असं सदर आंदोलकांनी सांगितले. त्यानंतर या परिसरात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली.
मराठा आंदोलकांना महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने मदत-
मुंबईच्या आझाद मैदानातील मराठा आंदोलकांना महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने मदत येत आहे. भाकरी, चपात्यांबरोबर तांदूळ, गहू, पाणी, बिस्किट, मसाले, लोणचे इत्यादी साहित्य येण्यास सुरुवात झाली. आलेल्या मदतीचे ढीग लागले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील खेडे गावातून शेतकरी बांधव मदत पाठवत आहेत. आंदोलनाचे दिवस वाढू लागल्याने उपासमार होऊ नये म्हणून मदतीचा ओघ सुरु आहे.
मनोज जरांगेंचा गंभीर आरोप-
गळ्यात भगवे रुमाल अणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या माघारी पाठवत आहेत. जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितलंय, असं या पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचं जरांगे म्हणाले. या पोलिसांना निलंबित करा, अशी मागणी जरांगेंनी केली. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिला आहे.