मुंबई: मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. पोलिसांकडून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटी-शर्तींसह आंदोलनास परवानगी देण्यात आलेली होती. परंतु या आंदोलनात नियमांची पायमल्ली होत असल्याचं सांगत काल मुंबई हायकोर्टाने आंदोलकांनी व्यापलेले दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही जरांगे यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही दिलेले नियम पाळले जात असल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीला आझाद मैदान रिकामे करण्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती आहे, दरम्यान आंदोलनकांनी मनोज जरांगे पाटील आमचं कोर्ट आहे, त्यांनी सांगितलं तर मुंबई खाली करू असा पवित्रा घेतला आहे.
आम्ही त्या कोर्टाचा ऐकणार, त्या कोर्टाने आदेश दिला की....
एबीपी माझाशी बोलताना आंदोलकांनी म्हटलं की, आम्ही त्या कोर्टाचा ऐकणार, त्या कोर्टाने आदेश दिला की आम्ही लगेच जाणार. आम्हाला बाकीचे कोर्ट माहित नाहीत. आम्हाला त्यांनी (जरांगेंनी) अजून काय सांगितलं नाही. त्यांची अवस्था थोडी खराब झाली आहे. ते काय बोलतील. आजचा पाचवा दिवस आहे. मनोज दादांनी कालपासून पाणी बंद केलं आहे. आम्ही मनोज जरांगे दादांना एकच विनंती करतो तुम्ही पाणी तरी घेतलं पाहिजे. आम्ही कोर्टाचं नाही तर मनोज जरांगे जे सांगतील ते ऐकू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. जरांगे यांनी सांगितल्यानंतर आम्ही हे ठिकाण सोडू असंही त्यांनी पुढे म्हटले आहे.
त्यामुळे आम्हाला नाईलाजाने अशा ठिकाणी आश्रय घ्यावा लागतोय
मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे सगळा मराठा समाज त्यांचं ऐकायला तयार आहे. मात्र इथे आल्यानंतर कोणत्याही सुख सुविधा उपलब्ध नाहीत. आझाद मैदानामध्ये लिमिट दिलेली आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला या ठिकाणी बसावं लागत आहे, नाहीतर मनोज जरांगे यांच्या आदेशाचा आम्ही काटेकोर पालन करत आहोत आणि कायद्याने सांगितलेल्या चौकटीत सुद्धा आम्ही काम करत आहोत. परंतु सुख सुविधेचा अभाव असल्यामुळे मराठा समाज आता इथे थांबत आहे, बाहेर पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आम्हाला नाईलाजाने फुटपाथवर अशा ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे, असंही आंदोलकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
हे सरकार मराठी माणसाचा छळ करत आहेत
कोर्टाने सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय सुविधा आणि अन्नपुरवठा याचा सुविधा मिळत नाहीत, सरकारने आम्हाला दोन दिवस अगोदर पाणी बंद केलं आणि इथले जे हॉटेल होते तेही बंद केले त्यानंतर आमच्या मराठा समाजाने आणि इतर समाजाने सुद्धा आम्हाला गावागावातून अन्नधान्याची मदत केली, भाकरी बनवून भाज्या बनवून ट्रक इथं पाठवल्या. हे सरकार मराठी माणसाचा छळ करत आहेत. माणसाला त्रास देत आहेत आणि त्यांचा गैरफायदा घेत आहेत. मराठी माणसं गप बसलेले, किती शांततेने वातावरण आहे. पण हे सरकार त्याच्याविरुद्ध चालत आहे. पाऊस आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी कुठे बसायचं. आतापर्यंत आझाद मैदानावर कुठे सोय होती? आम्ही कुठे बसायचे? सगळा चिखल होता, वरून ताडपत्री नाही, मंडपही नाही, कुठे बसणार आम्ही? चिखलामध्ये बसणार का? त्यामुळे इथं स्टेशनमध्ये येऊन सगळी माणसं बसले. दुसरीकडे कुठे सहारा नाही मग माणसाने काय करायचं. थोडी माणसं आहेत का? अशाप्रमाणे मराठा माणसाची फजिती या सरकारने लावली आहे. गाड्या कुठे नेऊन लावणार आम्ही, मग सरकारनंची सोय करावी. पार्किंगसाठी त्यांनी जागा दाखवावी. ज्या ठिकाणी त्यांनी सांगितले त्या ठिकाणी आम्ही गाड्या लावलेल्या आहेत. त्यांनी ज्या ठिकाणी पार्किंग दिले त्या ठिकाणी शौचालय किंवा अंघोळीची सोय नाही. कोणती व्यवस्था नाही. राहण्यासाठी सिमेंटचे गोडाऊन दिले आहे. तिथे कसं राहणार आम्ही. आमचे अंग भुतासारखे व्हायला लागलेआहेत, त्या सिमेंटच्या गोडाऊनमध्ये पाण्याची सोय नाही, जेवणाची व्यवस्था नाही, त्यामुळे आम्हाला तिकडून इकडे झोपण्यासाठी यावे लागत आहे. आम्हाला रे रोडला सिमेंटचे गोडाऊन राहण्यासाठी दिले होते, असंही पुढे आंदोलकांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.