Manoj Jarange Patil Bombay High Court Hearing : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीत मनोज जरांगे पाटील यांचे वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी जोरदार युक्तिवाद करत मनोज जरांगेंना तात्पुरता दिलासा मिळवून दिला. आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत. आतापर्यंत 54 मोर्चे शांततेत झाले आहेत. जे लोक आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांनी शहरातून बाहेर जाण्यास सुरुवात केली आहे. कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचं आवाहन करण्यात आल्याचं सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात म्हटले. यानंतर उच्च न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली आहे. आता उद्या दुपारी एक वाजता सुनावणी पार पडणार आहे.
मनोज पाटील यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी परवा सुनावणी ठेवावी, अशी मागणी हायकोर्टात केली. यानंतर तुम्ही तिथे का थांबला आहात? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. आझाद मैदानात केवळ 24 तासांची परवानगी दिली होती, असे देखील कोर्टाने स्पष्ट केले. आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत. आतापर्यंत 54 मोर्चे शांततेत झाले आहेत, असे भूमिका सतीश मानेशिंदे यांनी स्पष्ट केले.
तुम्ही सतत नियमांचे उल्लंघन करत आहात
यावर तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात? तुम्हाला परवानगी नाही, अशी विचारणा कोर्टाने केली. तुम्हाला कोर्टाचे आदेश दिले आहेत. आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात परवानगी होती. ते तिथे आणखी थांबू शकत नाहीत. ते शहरात इतरत्र कुठेही थांबू शकतात. तुम्ही सतत नियमांचे उल्लंघन करत आहात, असे हायकोर्टाने म्हटले. यानंतर अनेक आंदोलनकर्ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर गाड्या हटवण्यात आल्याची माहिती सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात दिली. यानंतर तुम्ही जर 24 तासांनी संतुष्ट नव्हता तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं, असे म्हणत उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना बजावले.
आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही
50 हजारांपेक्षा जास्त लोक होती, तोवर तुम्ही काय करत होता? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली. यानंतर आंदोलनकर्त्यांचे वकील म्हणाले की, 31 मे रोजी आम्ही पहिला अर्ज केला. 25 जुलैला दुसरा अर्ज केला. त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली. मात्र, आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही. आता तुम्ही म्हणू शकत नाही की, पूर्वकल्पना दिली नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
आंदोलक शहरातून बाहेर जाण्यास सुरुवात
ती जागा सत्याग्रहासाठी आहे का तर हो आहे. 5000 हजार लोकांना परवानगी होती का तर हो होती, अशी भूमिका देखील जरांगे पाटील यांच्या वकिलांनी स्पष्ट केली. यानंतर आम्ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यास तयार आहोत, असे हायकोर्टाने म्हटले. यानंतर आम्ही लोकांना खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाड्या काढण्यास सांगितलं आहे. कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आवाहन करण्यात आलं आहे, असे सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात म्हटले. जे लोक आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांनी शहरातून बाहेर जाण्यास सुरुवात केल्याचे देखील वकिलांनी कोर्टात सांगितले. यानंतर उच्च न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली आहे. आता उद्या दुपारी एक वाजता सुनावणी पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा