मुंबई : सरकारने आणि पोलिसांनी आधी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पार्किंग झोन घोषित करावेत, जेणेकरुन बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना त्यांच्या गाड्या कुठे लावायच्या याची माहिती मिळेल. आझाद मैदानाच्या आजूबाजूची मैदाने पार्किंगसाठी मोकळी करा, मराठे शांततेत आंदोलन करतील हा सरकारला शब्द आहे असं मनोज जरांगे म्हणाले. मराठा आंदोलकांनीही पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी गाड्या लावाव्यात असंही ते म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो मराठे येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याचं दिसून येतंय. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पोलिसांना आणि मराठा आंदोलकांनाही आवाहन केलं.

मुंबईचे रस्ते ब्लॉक

मनोज जरांगेंच्या आदोलनानंतर आझाद मैदानाकडे येणारे सगळे रस्ते ब्लॉक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सायन-पनवेलपासून गाड्यांच्या रांगाच रांगा रस्त्यावर पाहायला मिळाल्या. तसेच इस्टर्न फ्री वेवरही गाड्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांना आवाहन करत पार्किंगची माहिती द्यावी असं आवाहन केलं.

पार्किंगची माहिती पोलिसांनी द्यावी

मी उपोषण करत असल्याने मला उद्यापासून बोलायला जमणार नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने पार्किंग जाहीर करावे आणि माध्यमांना द्यावेत, त्यामुळे लोकांना त्याची माहिती मिळेल असं मनोज जरांगे म्हणाले. आंदोलकांनीही पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावून लोकलच्या माध्यमातून आझाद मैदानाकडे यावं असंही ते म्हणाले. 

मुंबईची एक टीम सोबत ठेवा

विरार परिसरातील लोकांनी त्यांच्या गाड्या या पोलिसांनी सांगितलेल्या मैदानावर लावाव्यात आणि लोकलने आझाद मैदानात यावं. पोलिसांनीही त्यांना तातडीने पार्किंगची माहिती द्यावी. त्यासाठी मुंबईची एक टीम पोलिसांसोबत असावी. पोलिसांनी 29 मैदाने पार्किंगला दिल्याची माहिती दिली. पण ती मैदाने नेमकी कुठली आहेत याची माहिती मात्र दिली नाही. त्यामुळे त्याची माहिती लवकरात लवकर द्यावी असं जरांगे म्हणाले.

मी तर संपणार नाहीतर आरक्षण तरी घेणार

ही लढाई आता आरपारची आहे, मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करुन मी तरी मरणार, पण मागे हटणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. आता फक्त आरक्षणच नाही तर तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.

ही बातमी वाचा: