मुंबई: शिवसेना आणि भाजपची युती टिकून राहावी यासाठी मी मुद्दाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बोलवलंय, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी केलं. मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य करणं टाळलं.


दादरमधील शिवाजी मंदिरात आज मनोहर जोशींच्या 'आयुष्य कसे जगावे' या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला. आज जोशी सरांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्रिपुराचे राज्यपाल डी वाय पाटील उपस्थित होते.

यावेळी बोेलताना मनोहर जोशी म्हणाले की, ''शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक शिवसैनिकांवर नातलगाप्रमाणे प्रेम केले. त्यांच्या आणि उद्धव ठाकरेंच्यामुळेच मला शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.''

''युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पदावर असताना, मनोहर जोशींनी अनेक आव्हानांचा समर्थपणे सामना केला,'' असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ''मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पदावर असताना अनेक चांगल्या उपक्रमांची सुरुवात केली. यातीलच एक उपक्रम होता प्रौढ शिक्षणाचा. या उपक्रमाची सुरुवात मनोहर जोशी सरांनी वर्षा बंगल्यातूनच केली. याची मी चौकशी केली असता, मला समजले की, मनोहर जोशी सरांनीच त्याकाळी सर्वांना साक्षर केल्याने आता प्रौढ शिक्षणाची गरज नाही.''

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मनोहर जोशींच्या कामाचा उल्लेख करुन त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.