मुंबई : मानखुर्दमधील ज्योतिर्लिंग नगर परिसरातून गेले दोन महिने बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय रोहिणी अभिजित घोरपडे या महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. महिलेने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिच्या प्रियकराने त्याच्या दोन मित्रांच्या सहाय्याने रोहिणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी या महिलेचा प्रियकर सुनील रामा शिर्के याच्यासह त्याचा मित्र रामचंद्र तुकाराम जाधव आणि विजयसिंह भास्कर मोरे या तिघांना अटक केली आहे.
रोहिणी या वाशी महानगरपालिका रुग्णालयात कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचा रेल्वे अपघतात मृत्यू झाला होता. त्यांना एक 9 वर्षाचा मुलगा देखील आहे. रोहिणी या 14 नोव्हेंबर रोजी मैत्रिणीच्या लग्नाला जातो असे सांगून घरुन निघाल्या. परंतु त्यानंतर त्या परतल्याच नाहीत. यावर 16 नोव्हेंबर रोजी त्यांचे भाऊ राजेंद्र मोहिते यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात त्या हरविल्याची तक्रार दाखल केली.
याप्रकरणी मानखुर्द पोलीस तपास करीत असताना त्यांना रोहिणीचे ती ज्या रुग्णालयात काम करते, तिथे काम करणाऱ्या आणि रोहिणीला कंत्राटी कामावर लावणाऱ्या सुनील शिर्के याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. याचबरोबर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी रोहिणी यांच्या बँक खात्यातून 65 हजार रुपये वाशी आणि कोपरखैराणे येथून काढल्याचे पोलिसांना समजले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता सुनीलचा मित्र राम जाधव याने हे पैसे काढल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावर रामने सांगितले की, त्यांनी या महिलेला सुनीलच्या मूळ गावी रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील शिरसाड येथे नेले. तिथे नेऊन विजयसिंह मोरे या मित्राची मदत घेऊन तिची हत्या केल्याचे सांगितले.
या नराधमांनी रोहिणीच्या डोक्यात फावड्याचा लाकडी दांडा मारून आणि नंतर तिच्याच साडीने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दोन दिवस अगोदरच यासाठी सुनीलने एका पडीक जागी खड्डा खोदून ठेवला होता. या खड्ड्यात तिला मीठ टाकून पुरले.
त्यानंतर सुनीलने रोहिणीचे एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड रामला देऊन त्याला सर्व पैसे काढून घेण्यास सांगितले. या सर्व अपराधाची आरोपींनी कबुली दिली आहे. सुनील आणि रोहिणीचे प्रेमसंबंध होते. गेले काही दिवस रोहिणी सुनीलकडे लग्नाचा आग्रह करीत होती. सुनील विवाहित होता, त्यालाही दोन मुले आहेत. या प्रेम प्रकरणाची माहिती त्याच्या घरच्यांना झाली आणि त्याच्या घरीदेखील वाद सुरु झाले. त्यामुळे सुनीलने रोहिणीच्या हत्येचा कट रचला आणि यातून हे हत्याकांड घडले.
लग्नाचा तगादा लावला, प्रियकराकडून विधवेची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2019 12:02 AM (IST)
मानखुर्दमधील ज्योतिर्लिंग नगर परिसरातून गेले दोन महिने बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय रोहिणी अभिजित घोरपडे या महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -