मुंबई : मुंबईतल्या शिवाजी नगर भागात केसाला लावलेल्या रंगाला हात लावला म्हणून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून शिवाजी नगर पोलिसांनी आरोपीला पळून जात असताना छेडा नगर येथून अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी आरोपी कमल रझा सैय्यद उर्फ शाहरुख याने आपल्या केसाला काळा रंग लावला होता, त्यावेळी केसांचा रंग ओला होता. त्याचवेळी त्याच्या ओळखीतल्या मोहम्मद हुसेन अब्दुल हमीद शेख (वय 25 वर्षे) याने शाहरुखच्या रंग लावलेल्या केसाला हात लावला. यावरुन दोघांमधे वाद झाला. या दोघांमधील वाद इतका वाढला की शाहरुखला त्याचा राग आला आणि त्याच्या जवळ असलेला चाकू त्याने काढला आणि सपासप त्याच्या पोटावर आणि गळ्यावर वार केले. कोणाला काही कळायच्या आत आरोपी कुमेल रजा सय्यद उर्फ शाहरुख हा हत्या करुन फरारही झाला. त्याला तेथील काही लोकांनी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेलं पण भरती होण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिवाजी नगर पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी आले. आरोपी शाहरुखच्या ते मागावर होते, पण आरोपी पळून गेला होता. पोलिसांच्या खबऱ्याने त्यांना तो नेरुळला पळून गेल्याची माहिती दिली. पण पोलीस येण्यापूर्वी तो तेथून फरार झाला होता. त्यानंतर तो विक्रोळी येथे जाणार अशी माहिती मिळाली असता त्यांनी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर सापळा लावला. छेडा नगर सिग्नल येथे शाहरुख येताच, त्याला ताब्यात घेऊन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणलं, अशी माहिती तपास अधिकारी हुसेन जतकर यांनी दिली.