मुंबई : मुंबईतील उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मलबार हिल’चे नाव बदलून त्याचे नामकरण ‘रामनगरी’ असे करण्यात यावे, अशी मागणी नुकतेच मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप लांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. लांडे यांनी 2013 साली मनसेत असताना देखील ही मागणी केली होती. त्यावेळी भाजपने या मागणीला पाठींबा दिला होता. त्यामुळे आता जर नामांतराची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे आली तर महापालिकेच्या महासभेत मंजूर करून हे नामांतर होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचा प्रभाव !
शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचा प्रभाव आता मुंबईतही दिसू लागला आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील या उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या मलबार हिल भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपद मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे.
नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे
मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासून उच्चारले जाते. मात्र मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांनाही या भागाची भुरळ पडली. त्यांनीही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ करावे, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. आता मलबार हिलच्या नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे आली आहे. ही ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे.
रामनगरी नाव का?
हा भाग हिंदूंचे पवित्र स्थान असल्याचा दावा केला जात आहे. सितामाईंच्या शोधात निघालेल्या प्रभू श्रीरामांचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्यांनी वाळूने बनवलेल्या शिवलिंगालाच नंतर वाळकेश्वर देवस्थानाचे रुप आले. प्रभू रामांना तहान लागली असता तीनही बाजूला समुद्र असल्याने गोडे पाणी सापडावे म्हणून लक्ष्मणाने बाणाने जमीनीचा वेध घेतला. त्यात जो तलाव निर्माण झाला तेच आज बाणगंगा म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय या भागात अनेक प्राचीन मंदिरेही आहेत.
मलबार हिल ‘रामनगरी’ होणार!, नामांतराच्या मागणीचा प्रस्ताव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Dec 2018 12:01 PM (IST)
मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासून उच्चारले जाते. मात्र मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांनाही या भागाची भुरळ पडली. त्यांनीही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -