मुंबई : नाम फाऊंडेशनमध्ये काम करत असताना, माणूस होण्याच्या प्रोसेसमध्ये असल्याचं जाणवतं. नाममधील काम ही माणूस होण्याची प्रोसेस आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.
“कुणावर टीका करण्यापेक्षा माझ्या कामावर मी बोलेन”
दुष्काळग्रस्तांसाठी सरकारकडून व्हायला हवी, तशी मदत न झाल्याने लोकांना नाम फाऊंडेशनला भरघोस प्रतिसाद दिला का, असा प्रश्न विचारल्यानंतर मकरंद अनासपुरे म्हणाले, “सरकारने काय काम केलं किंवा सरकारने काय करायला हवं होतं, यावर बोलण्यापेक्षा मी आम्ही काय काम केलं, यावर बोलणं मला महत्त्वाचं वाटतं. शिवाय, तुकाराम मुंढेंसारखी प्रशासनातील माणसंही नाम फाऊंडेशनच्या कामाचं कौतुक करतायेत आणि त्यात सहभागीही झाले आहेत. त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं.”
“महाराष्ट्रात दोनच सेलिब्रेटी आहेत का?”
“अभिनेता अक्षय कुमार, आमीर खान यांसारख्या बॉलिवूडमधील कलाकारांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, माझा प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रात केवळ दोनच सेलिब्रेटी आहेत का? महाराष्ट्राला नुसतं झाडलं, तर खोऱ्याने कलाकार सापडतील. मग मदत करण्यासाटी पुढे का येत नाहीत? मदत करण्याची मनापासून इच्छा असली पाहिजे.”, असे म्हणत मकरंद अनासपुरे यांनी खंतही व्यक्त केली.
नाम फाऊंडेशनला अनेक लोक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आता ही मदत अधिकाधिक लोकांपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा असल्याचा मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं.