उड्डाणापूर्वी प्रवाशानं विमानाचं सेफ्टी डोअर उघडलं, सुदैवानं अपघात टळला!
एबीपी माझा वेब टीम | 10 Feb 2017 06:47 PM (IST)
मुंबई : मुंबई विमानतळावर विमानानं उड्डाण करण्यापूर्वीच एका प्रवाशानं सेफ्टी डोअर उघडल्यानं चांगलाच गोंधळ उडाला. मुंबईहून चंदीगढला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या उड्डाणावेळी हा प्रकार घडला. विमानातील एका प्रवाशानं हा दरवाजा उघडला होता, ऐनवेळी हा प्रकार विमान कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतून चंदीगढला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईट नंबर 6ई 4134 नं उड्डाणाची तयारी केली होती. मात्र याचवेळी विमानात एका प्रवाशानं आपात्कालीन दरवाजा उघडल्यानं गोंधळ उडाला. विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीला सीआयएसएफच्या हवाली करण्यात आलंय. अचानक प्रवाशानं आपत्कालीन दरवाजा उघडल्यानं विमानाचं उड्डाण उशिरानं करण्यात आलं. याप्रकरणी इंडिगो एअरलाईन्सनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसंच प्रवाशानं अशा प्रकारे उड्डाणापूर्वी आपत्कालीन दरवाजा कसा काय उघडला, याच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.