मुंबईत साकीनाक्याजवळ भीषण आग, 12 कामगारांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2017 10:01 AM (IST)
आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली आणि आगीत काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई: मुंबईतील साकीनाक्याजवळ मिटाच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे. खैरानी रोडवरील 'भानु फरसान' या मिठाईच्या दुकानाला पहाटे 4.30 च्या सुमारास ही आग लागली. आगीनंतर दुकानाच्या बाहेर झोपलेले कामगार पळून गेले, मात्र जे कामगार आत झोपले होते, ते आतच राहिले. त्यातच आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आत अडकलेल्या कामगारांना बाहेर पडणं आणखी कठीण झालं. दुहेरी संकटात सापडलेल्या कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदरमरुन मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणि आगीत जवळपास 15 कामगार अडकले. यापैकी 12 कामगारांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अजूनही 3 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान, 3 फायर इंजिन, 4 जम्बो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळालं आहे. मात्र या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. https://twitter.com/abpmajhatv/status/942621880548081664