Majha Maharashtra Majha Vision : जातीचा मुद्दा त्या त्या जातीतील नेत्यांना मोठं करण्यासाठी पुढे केला जातो. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.  गेल्या काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कुणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले. मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 


 महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेश वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला हे डाग लावणारं आहे. महाराष्ट्र जातीपातीत गुंतत चालला आहे. सर्वांनाच जातीचा अभिमान असतो आणि असला पाहिजे. पण त्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या जातीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीचा मुद्दा वाढला, असं राज ठाकरे यांनी यांनी म्हटलं. 


लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल


जो पर्यंत आपण देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर गांभीर्याने विचार करत नाहीत तोवर देशातील प्रश्न सुटणार नाहीत. लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. याबाबत ठोस निर्णय घ्यावे लागतील. वाढणारी लोकसंख्या आणि विकासकामे यांचा ताळमेळ जमत नाहीये, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 


स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची प्रगती झाली यात शंका नाही. मात्र रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का? आपण अजूनही भागा भागात विचार करतोय. देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत? आजही आपल्या निवडणुकीतले विषय बदलेले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण याच विषयावर निवडणुका लढवल्या जात असतील तर आपण कशात प्रगती केली? याचा विचार झाला पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं.