मुंबई : 'विकेल ते पिकेल' ही मुख्यमंत्र्यांची कन्सेप्ट आहे. आयटी क्षेत्राचा वापर करुन प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. शेतीचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. सहाव्या सत्रात दादाजी भुसे यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.


सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारीनंतर दोषी कंपन्यांनवर गुन्हे
गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बियाण्यांच्या तक्रारी आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. याविषयी दादाजी भुसे म्हणाले की, "सोयबीनच्या बियाण्यांबद्दल तक्रारी आल्या. 75-80 टक्के छाननी पूर्ण झाली असून ज्या कंपन्या दोषी आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. महाबीज हे कृषी विभागाचंच महामंडळ आहे. बियाण्यांमध्ये दोष असेल तर रिप्लेस करुन देण्याची सूचना दिली होती. शिवाय रक्कमही देण्यास सांगितलं होतं."


युरियाची कमतरता पडू देणार नाही
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याच तालुक्यात युरियाचा तुटवडा असल्याचा आरोप होत आहे. यावर दादाजी भुसे म्हणाले की, कृषीमंत्र्यांचा तालुका असल्याने मागच्या वर्षीपेक्षा सव्वा दीड पटीने जास्त युरिया मालेगावला उपलब्ध करुन दिलेला आहे. मात्र आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी येतात, त्यांनाही युरिया द्यावा लागतो. पण कोणालाही युरियाची कमतरता पडू देणार नाही. एकाच वेळी मागणी वाढल्याने काही वेळा कमी पडला असेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच 266 रुपयात युरियात मिळत आहे."


महाराष्ट्राची कर्जमाफीची योजना ही कमी कालावधीत सर्वात जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी 
येत्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभं करणार असल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. "भारतातील कमी कालावधीत सर्वात जास्त शेतकऱ्यांना (संख्या आणि रक्कम) लाभ देणारी ही महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना आहे. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरमध्ये या योजनेची घोषणा केली. जानेवारी ते 15 मार्चपर्यंत पात्र शेतकऱ्यांची यादी करण्यात आली आणि 15 मार्चनंतर त्याची अंमलबजावणी झाली. 30 ते 32 लाख शेतकरी पात्र ठरतात. त्यामधील 19 लाख शेतकऱ्यांना मार्चमध्ये 12 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले," असं दादाजी भुसे यांनी सांगितलं.


माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.


याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


Majha Maharashtra Majha Vision | शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न : कृषीमंत्री दादाजी भुसे