मुंबई : "आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष व्हायचंच. पण आता सगळ्या रिक्त जागा भरणार आहे. प्राथमिक सेवा देणारा आमचा विभाग आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील सगळ्या जागा भरणार आहेत. तसंच जिथे गरज आहे तिथे रुग्णालयं वाढवणार आहे," असा निर्धार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्रात अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 70 लाख टेस्टिंग केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.


विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. पाचव्या सत्रात राजेश टोपे यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.


कोरोनाला घाबरायचं नाही
"लस येत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे. बऱ्यापैकी नियंत्रण आणलेलं आहे. सगळ्यात जमेची बाब म्हणजे अडीच लाखांपेक्षा रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. मुंबईत सध्या 25 ते 30 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा डबलिंग रेट 30 दिवसांचा आहे. मृत्यूदर साडेतीन टक्क्यांवर आहे. तर 60 टक्क्यांवर रिकव्हरी रेट आहे. कोरोनाबाबत सतर्कता ठेवायची आहे, जागरुकता ठेवायची आहे परंतु घाबरायचं नाही. कोरोनातून बरे होतोच," असं राजेश टोपे यांनी सांगितलं.


सामान्य रुग्णाला डोळ्यासमोर ठेवून सरकार धोरण राबवत आहे. खासगी रुग्णालय ताब्यात घेतले, जम्बो हॉस्पिटल बांधले. अॅम्ब्युल्स  घेतल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सेवा देत आहोत, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.


राजेश टोपे म्हणाले की, "कोरोनासोबत जगत असताना नागरिकांनी एसएमएस म्हणजेच (सोशल डिस्टन्सिंग+मास्क+सॅनिटायझर) हे धोरण अवलंबलं पाहिजे. यासाठी लोकांचं सहकार्य आवश्यक आहे. कोरोनाला न घाबरता आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायला हवी. यासाठी उत्तम आहार, व्यायाम महत्त्वाचा आहे. रक्तातली साखर मर्यादित ठेवावी लागेल."


लॉकडाऊन उठवायचा आहेच, पण टप्प्याटप्प्याने
"लॉकडाऊन संपवा आणि सगळं सुरु करा," असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'च्या पहिल्या सत्रात व्यक्त केलं. त्याविषयी विचारलं असता राजेश टोपे म्हणाले की, "राज ठाकरे यांचं म्हणणं काही अंशी योग्य आहे.  पण लॉकडाऊन पूर्णपणे उठलं तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. लॉकडाऊन उठवायचा आहेच, पण टप्प्याटप्प्याने. अनलॉकिंगसाठी थम्बरुल आहे. मुंबईत लॉकडाऊन विषय राहणार नाही, अनलॉकचाच राहिल."


मुंबईकडे लक्ष दिलं याचा अर्थ इतर जिल्ह्यांकडे दुर्लक्ष केलं असं नाही
राज्य सरकारने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईकडे अधिक लक्ष दिलं, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात केला. त्याबाबत राजेश टोपे म्हणाले की, "मुंबईत छोटी घटना घडली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची प्रतिक्रिया उमटते.भारताच्या इमेजचा प्रश्न मुंबईशी निगडित आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईकडे लक्ष देणं साहजिकच महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ इतर भागांमध्ये दुर्लक्ष केलं, असा होत नाही. पुण्याकडे तेवढं लक्ष दिलं जात आहे. नाशिक, नागपूर औरंगाबादमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणत्याही शहराला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. सगळीकडे लक्ष देत आहोत. मुंबई हे नाक आहे. मुंबईतं नियंत्रण मिळवलं तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळतो."

आरोग्य विभागातील रिक्त जागा भरणार
आरोग्यावरील खर्च वाढवणार आहे. याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "आरोग्य विभागातील सगळ्या रिक्त जागा भरणार आहे. प्राथमिक सेवा देणारा आमचा विभाग आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील सगळ्या जागा भरणार आहेत. तसंच जिथे गरज आहे तिथे रुग्णालयं वाढवणार आहे. स्वच्छता, नम्रता आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीवर आमचं विभाग काम करेल. उच्चभ्रूंनी इथे उपचार घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे, अशा दर्जाची सरकारी रुग्णालयं बनवणार आहे."

माझा व्हिजनमधील प्रमुख पाहुणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि कृषी मंत्री दादाजी भुसे हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार आहेत.

याशिवाय मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असावं यावर चर्चा करण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नितीन वैद्य, संगीतकार अतुल गोगावले सहभागी होणार आहेत.


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


Majha Maharashtra Majha Vision | Rajesh Tope Vision | आरोग्य विभागातील रिक्त जागा भरणार : राजेश टोपे