मुंबई : विश्वचषकाच्या निमित्ताने विनोद कांबळी 'एबीपी माझा'वरील 'माझा कट्ट्या'वर या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी विनोद कांबळीने विश्व चषकाविषयीच्या त्याच्या आठवणींना उजाळा दिला. विनोदचा बॉलबॉय ते विश्वचषकवीर प्रवास, या प्रवासातील कटूगोड आठवणी विनोद कांबळीने सर्वांना सांगितल्या.
क्रिकेटवर माझं प्रेम बाबांमुळे झालं. माझे वडील स्वत: क्रिकेटर असल्याने मी क्रिकेटर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. वडीलांना मला क्रिकेटमध्ये खूप साथ दिली. मात्र क्रिकेट खेळण्याची खरी प्रेरणा 1983 च्या विश्वचषकामुळे मिळाली. कपिल देव यांना विश्वचषक हातात घेतलेलं पाहून, मीही विश्वचषक जिंकावं, असं स्वप्न पाहायला लागलो.
बॉल बॉय ते क्रिकेटर
1987 च्या विश्वचषकात मी बॉल बॉय म्हणून वानखेडे स्टेडियमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही माझ्यासोबत होता. बॉल बॉयचा तो अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय होता. भारताने तो सामना गमावला पण आमच्यातील क्रिकेटर होण्याची इच्छा दुपटीनं वाढली. क्रिकेटमधील त्यावेळच्या महान खेळाडूंना खेळताना पाहून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, असं विनोद कांबळीने सांगितलं.
सचिन आणि अर्जुनमधील साम्य, फरक?
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर खूप मेहनती मुलगा आहे. तो खूप उत्साही आहे आणि त्याच्यात क्षमताही आहे. सचिन आणि अर्जुन यांच्यामधील साम्य म्हणजे दोघंही माझ्यावर प्रेम करतात असं विनोद कांबळीने सांगितलं. तर दोघांमधील फरक म्हणजे सचिन उजवा आहे आणि अर्जुन डावा आहे, असं विनोदने सांगितलं.
धोनी टीम इंडियाचा 'कृष्ण'
विराट टीम इंडियाचा कर्णधार आहे, मात्र मैदानात धोनी नेतृत्व करतो असं नेहमी बोललं जातं. यावर बोलताना विनोद कांबळी म्हणाला की, धोनी संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होतो, त्यामुळे त्याने विराटले सल्ले देणे हा त्याचा अधिकार आहे. धोनी स्टम्पमागील टीम इंडियाचा कृष्ण आहे, असं विनोदने सांगितलं.