मुंबई : भाजपने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना गंडवलं आहे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सेना-भाजप वादावर म्हणाले. शिवाय, राजस्थानमध्ये मायावतींनी जसं दबाव वापरुन काँग्रेसकडून मंत्रिपदं घेतली, ते उदाहरण उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवायला हवं होतं, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात बोलत होते.

 

पवारांवर बोलण्यास नकार, मात्र राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष निशाणा

 

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर बोलणार नाही, असे म्हणत शरद पवारांच्या संभाराजेंच्या खासदारकीवरील वक्तव्यावर बोलण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी टाळलं. मात्र, अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा एका समूहाचा पक्ष आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा काही राज्यव्यापी पक्ष नाही. एका ठराविक प्रदेशापुरता मर्यादित आहे.” असे म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशामा साधला.

 

तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी राहुल गांधींना उपाध्यक्षपद

 

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातही काँग्रेस पक्षाला यश मिळत नाही, मग अशा कोणत्या गुणांमुळे त्यांच्याकडे नेतृत्त्व दिले जात आहे, या प्रश्नावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “तरुणांना काँग्रेस पक्षाकडे आकर्षित करण्यासाठीच जयपूरच्या अधिवेशनात सर्वानुमते राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं उपाध्यक्षपद देण्यात आलं.”

 

विरोधी पक्ष म्हणून अजून आक्रमक होण्याची गरज

 

“आम्ही 15 वर्षे सत्तेत राहिलो. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सध्या आम्हाला तेवढं आक्रमकपणे काम करता येत नसेलही, पण विधानसभा आणि विधानपरिषदेत आम्ही आक्रमकपणे जनतेचे मुद्दे मांडत आहोत. येत्या काळात सरकारच्या अपयशाचे मुद्दे जनतेपर्यंत घेऊन जाऊ आणि विरोधी पक्ष म्हणून आणखी आक्रमकही होऊ.”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.