मुंबई : 'मैं भी चौकीदार' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी मोहिमेनं वकिलांना अडचणीत आणलं आहे. या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या वकिलांविरोधात मुंबईतील एका वकिलाने थेट बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली आहे. वकिली व्यवसायात असताना अन्य व्यवसायाचा उल्लेख वकील करु शकत नाही, असा दावा अॅड. एजाज नक्वी यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आला आहे.
बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार कोणत्याही वकिलाला वकिली क्षेत्रात असताना अन्य व्यवसाय किंवा नोकरी करता येत नाही. मात्र असे असतानाही अनेक वकिलांनी आपल्या सोशल मीडियावरील नावाच्या आधी 'चौकीदार' असं लिहिलं आहे. यामुळे नियमाचा तर भंग होतच आहे, त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातही वकिली व्यवसायाबाबत दिशाभूल निर्माण होत आहे, असा दावा या तक्रारीमध्ये केला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाला पाठविलेल्या या आठ पानी पत्रामध्ये सध्या राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या वकिलांचा उल्लेखही करण्यात आला आहे.
अशाप्रकारे स्वत:ला चौकीदार म्हणवून वकिलांनी दुसरा व्यवसाय स्वीकारल्याचे सिद्ध होत आहे, असा दावा या तक्रारीत केला आहे. वकील हा एकप्रकारे न्यायालयाचा अधिकारी असतो, त्याने कायद्याच्या अमंलबजावणीबाबत कार्यशील असायला हवे. कायद्याच्या हितासाठी दक्ष असायला हवे, त्यामुळे अशाप्रकारे न्यायक्षेत्राला बाधक ठरणारी कृती करण्यास त्यांना मनाई करावी, अशी मागणी तक्रारीमध्ये अॅड. एजाज नक्वी यांनी बार कौन्सिलकडे केली आहे. आपल्या दाव्याच्या पुष्टीदाखल त्यांनी काही नावे आणि मोबाईलचे काही स्क्रीन शॉटसही तक्रारीसोबत जोडले आहेत. बार कौन्सिलसह महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलकडेही याबाबत रितसर तक्रार करण्यात आली आहे.