मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क मैदान (Shivaji Park) प्रचार सभांना मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बीएमसीकडे अर्ज केले आहेत. एप्रिल आणि मे सभांसाठी मैदानाची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. 17 मे रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेच्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेसाठी अर्ज करण्यात आला आहे.  त्यातच शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठीही अर्ज दाखल झाला आहे. 


यातील अर्ज केलेल्या प्रत्येक पक्षाला परवानगी मिळेलच असं नाही. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी देण्यासाठी नियम, अटी आणि दिवस या सगळ्यांचा विचार करून परवानगी दिली जाते. एकाच तारखेला जर दोन पक्षांनी अर्ज केले असतील तर ज्या पक्षाने पहिल्यांदा अर्ज केला आहे त्या पक्षाला परवानगी दिली जाते. 


शिंदे गटाकडून सर्वाधिक तारखांना अर्ज


एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शिवाजी पार्क आपल्या सभांसाठी मिळावं यासाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसांसाठी 16 , 19 , 21 एप्रिल सभा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून अर्ज केला आहे. तर 3 मे, 5 मे, 7 मे रोजीही निवडणुक प्रचार सभेसाठी हे मैदान मिळावं म्हणून शिंदे गटाने अर्ज केला आहे. 


भाजपकडून 23, 26 आणि 28 एप्रिल रोजी हे मैदान मिळावं म्हणून अर्ज करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही 22, 24 आणि 27 एप्रिल रोजी शिवाजी पार्क सभांसाठी मिळावं म्हणून अर्ज करण्यात आला आहे. 


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकाच दिवशी मागणी


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी  17 मे ला मैदान मिळावे यासाठी मनसेने महापालिकेकडे अर्ज केला आहे. तर त्याच दिवशी आपल्याला मैदान मिळावं म्हणून शिवसेना ठाकरे गटानेही अर्ज केला आहे. त्यामुळे 17 मे रोजी कुणाच्या सभेसाठी परवानगी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे


दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा आताच अर्ज


शिवसेना शिंदे गटाकडून  12 ऑक्टोबर रोजीच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे असा अर्ज मुंबई महापालिकेकडे करण्यात आला आहे. दरवर्षी शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून या मैदानासाठी अर्ज केला जातो. त्यावरून दोन्ही गटामध्ये वादही निर्माण झाल्याचं दिसून येतंय. शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा साजरा केला जातोय. तर शिंदे गटाकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये घेण्यात येतोय. त्यामुळे आता शिंदे गटाने आधीच हे मैदान बुक केल्याचं दिसतंय.


शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे अर्ज


शिंदे गट- 16 एप्रिल, 19 एप्रिल, 21 एप्रिल, 3 मे, 5 मे, 7 मे


अजित पवार गट- 22 एप्रिल, 24 एप्रिल, 27 एप्रिल 


भाजप- 23 एप्रिल, 26 एप्रिल, 28 एप्रिल


मनसे- 17 मे


ठाकरे गट- 17 मे


ही बातमी वाचा: