Maharashtra Rain News : शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे.  हवामान विभागानं पुढचे चार आठवडे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या तीन-चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तसंच पुढील पाच दिवस राज्यांना हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले असून येत्या तीन, चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे .  आता पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने राज्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याकडून पुढील 5 दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  


उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  


मुंबई, ठाणेसह या भागात पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.


4 आठवडे राज्यात कोसळधारा -


पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






चिपळूणमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस


चिपळूणमध्ये दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. कडाक्याच्या उष्णतेनंतर जिल्ह्यातील अनेक भागात वरुणराजाची दमदार एंट्री झाली आहे. मान्सूनच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उष्णतेमुळे हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. पहिल्याच पावसात महामार्गावर पाणीच पाणी झाले. तर गटारांच्या अर्धवट कामांमुळे चिपळूण शहरातील रस्त्यावर पाणी साचले. मान्सूनच्या आगमनामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग येणार आहे. 


सोलापुरात जोरदार पाऊस  -


सोलापूरमध्ये मान्सन धडकला असून पावसाने जोरदार बॅटिंग केली. सोलापूर शहरात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. मागील अनेक दिवसापासून सोलापूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती, पावसाने बळीराजा सुखावला आहे. 


लातूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग 


लातूर शहर आणि परिसरात पावसानं तुफान बॅटिंग केली. विजेच्या कडकडाटासह  पाऊसने जोरदार हजेरी लावली. औसा रोड, आंबेजोगाई रोड, बार्शी रोड, नांदेड रोड या भागातील मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत होतं. ढगाच्या गडगडाटासह पडणाऱ्या पावसाने खडक उन्हाळ्यानंतर पावसाचा फील दिला..


वाशिम -


वाशिमच्या कारंजा तालुक्यात मान्सूनपर्व पाऊस बरसला. त्यामुळे वाशिमकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. हवामान खात्याचा मान्सूनपूर्व पावसाचा अंदाजानुसार कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पाऊस आल्याने शहरात रस्त्याच्या  काही  भागात नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी वाहताना दिसत होतं.