Maharashtra Vidhimandal Assembly Session : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Maharashtra Vidhimandal Session) शेवटचे दोन दिवस उरले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच अद्याप कायम आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांना पुन्हा विनंतीपत्र पाठवले जाणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला मान्यता देण्याबाबत पत्र पाठवले जाणार आहे. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पुन्हा पत्र पाठवले जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकार पुन्हा राज्यपालांना पत्र पाठवणार आहे. राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करणारे हे पत्र असणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात जे बदल करण्यात आले आहेत त्याचा कायदेशीर अभ्यास करत असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवले आहे. राज्यपालांनी हा कायदेशीर सल्ला लवकर घेऊन राज्य सरकारने केलेली विनंती मान्य करावी अशी विनंती करणारे पत्र पुन्हा पाठवले जाणार आहे.
तारीख दिली तर विशेष अधिवेशन- सुनील प्रभू
अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे. राज्यपालांनी दोन दिवसात अध्यक्षपदाची तारीख दिली नाही आणि त्यानंतरची तारीख दिली तर विशेष अधिवेशन बोलावले जाईल. अशी माहिती शिवसेनेचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली. सुनील प्रभू म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी महाविकासआघाडी तयारी आहे राज्यपालांनी पत्र द्यावे. अधिवेशनाचा फक्त दोन दिवसाचा कालावधी उरला आहे राज्यपालांनी अधिवेशन कालावधी संपल्यानंतर निवडणुकीची तारीख दिली तर महाविकासआघाडी विशेष अधिवेशन घ्यायला तयार आहे. राज्यपालांनी दोन दिवसात अधिवेशनाची तारीख दिली नाही तर विशेष अधिवेशन घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असं ते म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणूक आज निश्चित होती पण राज्यपालांच्या आडून राजकारण भाजपा करते. भाजपाचा खरा चेहरा आज समजला असल्याचे ते म्हणाले. दोन दिवस झाले विधानसभा अध्यक्ष निवडणूक वरून प्रक्रिया सुरू होती तरी राज्यपालांच्या वतीने वेळ मागण्यात आला आहे, असं ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिवेशनाचे दोन दिवस उरले; आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha