मुंबई : नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापपर्यंत विधानसभा अध्यक्षांची (Maharashtra Vidhan Sabha Speaker) निवड झालेली नाही. पावसाळी अधिवेशन विधानसभा उपाध्यक्षांच्या हजेरीत केल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्ष मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी हे मतदान गुप्त असायचं मात्र आता गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानानं निवड करण्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे.
राज्यपालांनी विधानसभाध्यक्ष निवडीबाबत लिहिलं होतं पत्र
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले होते. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? अशी देखील चर्चा होत होती. मात्र विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच असेल असं खासदार शरद पवारांनी देखील स्पष्ट केलं होतं. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा गेल्या अधिवेशनावेळी सुरु होती.
विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कशी असते?
विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपालांना तारीख ठरवणं बंधनकारक असतं. राज्यपाल निवडणुकीची तारीख देतील त्याच्या आदल्या दिवशी अनुमोदक आणि अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला पाहिजे. शक्यतो सात दिवस आधी सदस्यांना कळवणं महत्त्वाचं असतं, मात्र त्यात बदलही करता येतो. राज्यपालांनी सहा ही तारीख दिली तर पाच तारखेला फॉर्म भरुन प्रक्रिया पार पाडता येईल. विधानसभा अध्यक्षांची निवड नियम 6/3 प्रमाणे गुप्त प्रमाणे घेता येते. सर्व आमदारांना दोन तासांची वेळ मतदानासाठी दिली जाते. दोन पेक्षा जास्त उमेदवार आले तर ज्याला कमी मत आहेत त्यांना वगळून पुन्हा दोघांमध्ये निवडणूक होते.
संबंधित बातम्या
Bhagat Singh Koshyari : विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार? राज्यपालाचं सरकारला पत्र