मुंबई : आमदार होण्यासाठी इच्छुक शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी व मनसे या पक्षांच्या विद्यमान 11 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 9 नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे, तर दोन नगरसेवकांनी बंडाचे झेंडे उभारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर समाजवादी पक्षाचे गटनेते व नगरसेवक रईस शेख यांना भायखळा मतदारसंघ सोडून पक्षाच्या आदेशानुसार मुंबईबाहेर भिवंडीत निवडणूक लढवावी लागत आहे.


त्याचप्रमाणे भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या 6 माजी नगरसेवकांनीही या निवडणुकीत आपले नशीब आजमवायचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येही 4 माजी नगरसेवकांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे, तर 2 माजी नगरसेवकांनी मात्र बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेना - भाजपला आपल्या बंडखोर आजी व माजी नगरसेवकांची समजूत काढत त्यांचे 'बंड' काहीही उपाययोजना करून अथवा अन्य पदांचे गाजर दाखवून 'थंड' करावे लागणार आहे.

सुदैवाने वडाळा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात आक्रमक होत उमेदवारीसाठी आडून बसलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर व विदमान ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने त्यांनी अर्ज न भरता माघार घेतली. त्यामुळे एक बंडोबा अगोदरच थंडोबा झाल्याने सेनेने व भाजपाने विशेषतः कोळंबकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेले विद्यमान 11 नगरसेवकांची यादी
1. शिवसेना - रमेश कोरगावकर - भांडुप (प.) मतदारसंघ
2. शिवसेना - दिलीप लांडे - चांदीवली मतदारसंघ
3. शिवसेना - महापौर विश्वनाथ महाडेश्वर - वांद्रे (पूर्व) मतदारसंघ
4. काँग्रेस - आसिफ झकेरीया - वांद्रे (प.) मतदारसंघ
5. काँग्रेस- जगदिश अमीन कुट्टी - अंधेरी ( पूर्व) मतदारसंघ
6. मनसे - संजय तुर्डे - कलिना मतदारसंघ
7. समाजवादी पार्टी - रईस शेख - भिवंडी
8. अखिल भारतीय सेना - गीता गवळी भायखळा
9. भाजप - पराग शहा - घाटकोपर ( पूर्व)
10. राजुल पटेल या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. मात्र वर्सोवा विधानसभा क्षेत्रातून त्या अपक्ष उमेदवार आहेत.
11. सुफीयान वनु हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. ते मानखुर्द - शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार आहेत.

माजी नगरसेवकांनाही लॉटरी
1. शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघ
2. शिवसेनेतर्फे माजी नगरसेविका यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघात उमेदवारी
3. काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांना भांडुप (प.) मतदारसंघ
4. काँग्रेसतर्फे माजी नगरसेविका अजंता यादव यांना कांदिवली (पूर्व) मतदारसंघात उमेदवारी
5. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांना विक्रोळी मतदारसंघातून उमेदवारी
6. मनसेतर्फे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळाली आहे.