शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या 'सच्चाई' या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमासाठी भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामीही उपस्थित होते.
यावेळी स्वामी म्हणाले, " विधानसभा निवडणुकीत 12 आमदार येतील असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, मात्र त्यांनी प्रत्यक्षात 63 आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य खूप मोठं आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे"
उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला सज्जड इशारा दिला.
"गेली 25 वर्ष शिवसेनेबरोबर राहिल्यावर भाजपनं शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना आग आहे, आगीशी खेळ केला तर जळून खाक व्हाल", असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
तसंच भाजपनं राममंदिराची मुदत द्यावी, आम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देऊ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"मला नोटबंदीला विरोध करायचा नाही. लोकांना रांगेत उभं राहायची सवय होत आहे. 'पचास दिन' म्हणत किती कळ सोसायची. समाजावर संमोहन केलं गेलंय, इंग्रजांनीही असंच केलं होतं. ही सहनशीलता जनतेची कमकुवतपणा नाही", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.