मुंबई :  बारामती अॅग्रो कंपनीवर (Baramati Agro) करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोहित पवारांची (Rohit Pawar) याचिका फेटाळून लावा अशी विनंती प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) हायकोर्टाला (High Court) केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाने आपला अहवाल हायकोर्टात आजच्या सुनावणीत सादर केला. रोहित पवार यांच्या मालकीची असणाऱ्या बारामती अॅग्रो या कंपनीवर 28 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करत 72 तासांत प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. 


प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईच्या विरोधात रोहित पवार यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने पवार यांना दिलासा देताना तातडीच्या कारवाईस स्थगिती दिली. बारामती अॅग्रो कंपनीवर 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला आदेश दिले होते. हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला 6 ऑक्टोबर पर्यंत वस्तूस्थितीजन्य अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज हायकोर्टात सुनावणी पार पडली.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजच्या सुनावणीत बारामती अॅग्रो कंपनीवर गंभीर आरोप केले.  बारामती अॅग्रो कंपनीने पर्यावरण नियमावलीचं घोर उल्लंघन केले असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात  ठेवण्यात आला आहे.  बारामती ऍग्रोनं, हरीत लवादाकडे दाद मागणं आवश्यक होतं, असेही  प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले. 


रोहित पवार यांची याचिका फेटाळून लावण्याची विनंतीदेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हायकोर्टाला केली. दरम्यान,16 ऑक्टोबरपर्यंत रोहित पवार यांना हायकोर्टाने दिलेला दिलासा कायम आहे. तूर्तास 72 तासांच्या नोटीशीला हायकोर्टानं दिलेली स्थगितीही कायम ठेवण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरला रोजी बारामती अॅग्रो कंपनीच्यावतीने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अहवालावर युक्तिवाद करणार आहे. 


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारामती अॅग्रो कंपनीचे दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. या नोटिशीचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले होते. आपल्याविरोधात सूडाची कारवाई सुरू असून दोन मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर कारवाई झाली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्या दोन नेत्यांचे नावं लवकरच जाहीर करणार असं सांगताना या दोन नेत्यांबाबत आपल्याला शिंदे गटाच्याच एका नेत्याने माहिती दिल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.