Maharashtra Politics MNS: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election)पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray) राज्यात महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhan Yatra) सुरू असून दुसरीकडे भाजपच्यावतीने (BJP) मुंबईत 'जागर मुंबई'चा (Jagar Mumbaicha) अंतर्गत सभा सुरू आहेत. आता या दोन पक्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील (Maharashtra Navnirman Sena) मैदानात उतरणार आहे. मनसेच्यावतीने 'घे भरारी' सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या 2012 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवकांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतही मनसेला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आता मनसेकडून आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. 


मनसेकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'घे भरारी' सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभांमध्ये पक्षाचे नेते, सरचिटणीस मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीआधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी आणि त्यांच्यात उत्साह वाढवण्यासाठी या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'घे भरारी' संकल्पनेची लवकरच अधिकृत घोषणा होणार असून सभांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


भाजपकडून जागर मुंबईचा 


मागील मुंबई महापालिका निवडणुकीत थोडक्यात सत्ता गेल्यानंतर भाजपकडून यंदाच्या निवडणुकीत मुंबई काबीज करायची, असा चंग बांधला गेला आहे. भाजपकडून मुंबईत 'जागर मुंबईचा' या सभांचे आयोजन करण्यात येत असून शिवसेनेच्या नेतृत्वातील महापालिकेच्या कारभारावर टीका केली जात आहे. भाजपकडून अमराठी भाषिक विभागांसह मराठी बहुल भागांवरही लक्ष केंद्रीत केले जात आहे.  


शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी 


शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटासाठी आगामी मुंबई महापालिका निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून स्थानिक पातळीवरील शिवसैनिक हीच मोठी ताकद आहे. सध्या ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. ही यात्रा राज्यभर सुरू असून राज्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अद्यापही ठाकरे गटाने मोठी घोषणा केली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यातून मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला जात आहे.