Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे. ही बहुमत चाचणी पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिवसभराचा प्लॅन हाती लागला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीला सामोरे जातील. त्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवन प्रेस रूममध्ये पत्रकार परिषदेला सामोरे जातील. त्यानंतर बाहेर येऊन टीव्ही पत्रकारांना सामूहिकरीत्या संबोधित करतील. 


या संबोधनानंतर ते हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील.नंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील ( शिवाजी पार्क मधील) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जातील, तिथून चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करतील. 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट ठाण्याकडे निघतील.  ठाणे आणि मुंबई जिल्ह्याची सीमा धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर ( आनंद नगर चेक नाका) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे नगरीत स्वागत करण्यात येईल. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेतील. 


टेम्भी नाका येथील आनंदाश्रम  येथे भेट देणार तसेच समोरील पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.  त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या लुईसवाडी येथील 'शुभ-दिप' या निवासस्थानी जातील.  यावेळी ठाणे शहरातील समस्त शिवसैनिक आणि नागरिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात येणार आहे.


विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज परीक्षा आहे. आज सकाळी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, त्याआधी शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर मूळ शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले आहेत. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics Shivsena : पुन्हा कोर्टात धाव! शिवसेनेतली गटनेतेपदाची लढाई सुप्रीम कोर्टात


'मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील, ही तात्पुरती व्यवस्था'; संजय राऊतांचा दावा


Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारसाठी आज कसोटीचा दिवस; बहुमत चाचणी होणार, काय असेल रणनीती?