Sanjay Raut On Maharashtra Election : शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात एक दावा केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत. कायदेशीर लढाई त्या दृष्टीनं सुरु राहील. मात्र मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होतील. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपनं केलीय. 106 आमदार असतानाही दुय्यम भूमिका त्यांनी घेतली आहे. अशी व्यवस्था 2019 ला केली असती तर महाविकास आघाडीच झाली नसती. त्यावेळीही आम्हाला डावललं. त्यांचा हेतू शिवसेनेला फोडणं आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं असाच आहे, असं राऊत म्हणाले. भाजपला विश्वास असता की हे सरकार चालेल तर भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले.
गटनेतापद आणि व्हिपच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पक्षाच्या विरुद्ध कारवाई केली म्हणून शरद यादव यांंचं राज्यसभेतून निलंबन केलं. कायदा समान असेल तर एका ठिकाणी एक न्याय दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय का.. याला मी संसदीय लोकशाही मानत नाही. महाराष्ट्रात हेच सुरु आहे. झिरवाळ यांनी दिलेला निर्णय नवीन अध्यक्षांनी बदलला. ही राजकीय चढाओढ आहे. यातून सामान्य लोकांना काय मिळणार, असं ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, आपण फुटलेला आहात, आपण बाहेर गेलो आहोत हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. शिवसेना हा मूळ पक्ष आहे आणि तो राहील. 16 आमदारांच्या अपत्रातेबाबत याचिका प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेणं घटनाबाह्य आहे. ते पात्र की अपात्र हे सर्वोच्च न्यायालय घेईल. त्यानंतर हा निर्णय घ्यायला हवा होता. स्वार्थासाठी गुडघे टेकू नका अशी शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे, असंही राऊत म्हणाले.
विधिमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल पण राज्यात शिवसेना मजबूत
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. असा कोणताही गट कुणी ताब्यात घेऊ शकत नाही. विधिमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल पण राज्यात शिवसेना मजबूत आहे. शिवसेना कमजोर झाली असं म्हणणं बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. अशा अनेक प्रसंगातून आम्ही यापूर्वी गेलो आहोत. पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो, त्यातून पक्ष पुन्हा पुन्हा उभा राहतो. जोवर मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना मजबुतीनं उभी आहे तोवर दिल्लीचे मराठी माणसाच्या हातून महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे इरादे आहेत ते पूर्ण होणार नाहीत. भाजपच्या नेत्यानं सांगितलं आहे की महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यात मुंबई हा एक तुकडा आहे. मुंबईतील धनसत्तेवर काही लोकांना ताबा हवा आहे. त्यासाठी शिवसेना कमजोर करायची, त्यासाठी हा डाव आहे. पण शिवसेना कागदावर कमजोर झाली आहे, प्रत्यक्षात नाही. आजही शिवसैनिक रस्त्यावर येतील आणि लढा देतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपनं ही तात्पुरती व्यवस्था केली
संजय राऊत यांनी म्हटलं की, मुंबईत जणू सैन्य उतरवलं होतं, कसाबपेक्षाही जास्त सुरक्षा या आमदारांना दिली होती. भविष्यात त्यांची अवस्था अशीच असेल तर ते हे लोकप्रतिनिधी कसे? असं राऊत म्हणाले. भाजपनं ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपला शिवसेना फोडायची होती, त्यांनी शिवसेना फोडली. आणि फुटीर नेत्याला मुख्यमंत्री केलं, असं देखील राऊत म्हणाले. शिवसेना खासदारांच्या नाराजीबाबत विचारलं असता राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना कायम असेल. जिकडं ठाकरे तिकडे शिवसेना असेल. भारतीय सेना आणि शिवसेना या दोनच सेना देशात राहतील, असं राऊत म्हणाले.