Andheri East Bypoll Muraji Patel: भाजपच्या नेतृत्वाने अंधेरीतील पोटनिवडणुकीतून (Andheri Bypoll) उमेदवार मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद अंधेरीत (Andheri) दिसून आले. मुरजी पटेल (Muraji Patel) यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांना आपल्या भावना अनावर झाल्यात. निवडणूक कार्यालयाजवळ हा गोंधळ झाला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
 
मागील 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे  अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यावेळी शिवसेनेच्या रमेश लटके यांनी त्यांचा 16 हजार मतांनी पराभव केला. काही महिन्यांपूर्वी रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही आता पोटनिवडणूक होत आहे. मुरजी पटेल हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, भाजप नेतृत्वाने मुरजी पटेल माघार घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर पटेल यांच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजप आणि शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांना संताप अनावर झाल्याने त्यांनी अपशब्दांचा वापर केला. तर, काहींना भावना अनावर झालेल्या. 


भाजप विरोधात संताप


पोटनिवडणुकीतील माघारी घोषणेनंतर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे मुरजी पटेल यांचा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुरजी पटेल यांचे अंधेरी एमआयडीसी परिसरात असलेल्या 'जीवन ज्योत कार्यालया'बाहेर मोठ्या संख्येने भाजप समर्थक कार्यकर्ते जमा झाले आहेत. 


पटेल यांचा कार्यकर्त्यांना गुंगारा


मुरजी पटेल यांनी निवडणूक कार्यालयात दाखल होत अर्ज मागे घेतला. त्यानंतर पटेल यांनी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना गुंगारा देत बाहेर पडले. मुरजी पटेल हे सध्या भाजपच्या दादर येथील कार्यालयात असल्याची माहिती समोर आली आहे. मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते संतापले आहेत. भाजपला निवडणूक लढवायची नव्हती तर त्यांनी अर्ज का दाखल करायला सांगितला, असा सवाल त्यांनी केला आहे. 


पक्षाचा आदेश मान्य


पाहा व्हिडिओ: Murji Patel Supporters Rada : पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर मुरजी पटेल समर्थक कार्यकर्त्यांचा संताप



पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत  भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. त्यावेळी शेलार आणि पटेल यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता. निवडणुकीत विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: