मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यानंतर आता तिन्ही पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीसाठी भाजपने (BJP) महामंडळ वाटपाचे सूत्र निश्चित केले आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Faction) या प्रस्तावाला पर्याय देत आपला प्रस्ताव दिला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Ajit Pawar) जेवढी महामंडळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील, तेवढीच महामंडळे आपल्याला मिळावी, असा आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
फॉर्म्युला काय ठरला?
पालकमंत्रीपदानंतर महामंडळ वाटपाचाही महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या प्रस्तावानुसार शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 25 महामंडळे देण्याचा प्रस्ताव असून भाजपकडे 50 महामंडळे ठेवण्यात येणार आहे. तर, शिंदे गटाला भाजपचा प्रस्ताव अमान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाने महामंडळ वाटपासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 30 आणि भाजपला 40 महामंडळे मिळावीत असा फॉर्म्युला निश्चित केला आहे. येत्या आठवड्यात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढी महामंडळ मिळतील तेवढीच महामंडळे राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली असल्याचे सूत्रांनी म्हटले.
अजित पवारांच्या नाराजीची होती चर्चा
राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते. त्यामुळे त्याच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आज राज्य सरकारने नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली. यामध्ये अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले.
वर्षा बंगल्यावर शनिवारी झाली होती खलबतं
शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची वर्षा बंगल्यावर तब्बल दोन तास एक महत्त्वाची बैठक पार पडली. अचानक झालेल्या या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले. या बैठकीनुसार, पितृपक्षानंतर एक महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.