ठाणे : राज्यात ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना सुरु झाल्या असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटने राज्यात शिरकाव केल्याची शक्यता असून दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून  डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. आरोग्य विभागाच्या तपासणीतून ही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडल्याचं स्पष्ट झालं आहे.


या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले 


दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टवर केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. यामुळे त्याचे सर्व नातलग नातेवाईकांच्या घरी शिफ्ट झाले तर तो एकटाच घरी विलगीकरणात राहत होता. त्याला ताप येऊ लागल्याने त्याची कोरोना टेस्ट केली असता कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तातडीने लॅबकडून याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची  भीती असतानाच परदेशातून आलेला प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णाला पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या टेस्टचे नमुने उद्या जिनोम सिक्वेन्सीग साठी मुंबई येथे प्रयोग शाळेत धाडले जाणार आहेत. या रुग्णाची प्रकृती व्यवस्थीत असल्याचे डॉ पानपाटील यांनी सांगितले.


संबंधित बातम्या :