मुंबई :  मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवरून (Mumbai University Senate Election)  विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सिनेट निवडणूक मतदारयादी आणि निवडणुकीच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (Mumbai University Vice Chancellor) डॉ. रविंद्र कुलकर्णी (Dr. Ravindra Kulkarni) यांना घेराव घातला. यावेळी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न केला. सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनविसेने यावेळी दिला. 


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने आणि नव्याने मतदार नोंदणी करावी लागत असल्याने मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळांनी आक्रमक होत आज कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांची  भेट घेतली. यावेळी मतदार नोंदणीसह मुंबई विद्यापीठाच्या काही निर्णयावर मनविसेने नाराजी व्यक्त केली. यावेळी शिष्टमंडळाने कुलगुरुंविरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांना विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना अटकाव केला. 


तुमचा पुतळा जाळू...


सिनेट निवडणुकीत नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून तुमचे पुतळे जाळू, असा मनविसेने कुलगुरूंना थेट इशारा दिला. यामध्ये मनसे नेते गजानन काळे, अखिल चित्रे ,सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे, यश सरदेसाई यांनी कुलगुरू समोर या सगळ्या निवडणूक कार्यक्रमा संदर्भात जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिला.


कुलगुरूंना कोण चालवते आशिष शेलार यांच्या पत्रावर तुम्ही सिनेट निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करता? असा सवाल मनविसे नेते गजानन काळे यांनी केला. विदूषकाचा मास्क आम्ही यासाठी दिले की कणाहीन असलेले कुलगुरू आम्ही पहिल्यांदा त्या विद्यापीठात पाहतोय. सत्ताधारी आणि आशिष शेलार यांच्या फोनवरून निर्णय होऊ नयेत. यापुढे आम्ही कुलगुरूंचा पुतळा विदूषकाचा मास्क घालून विद्यापीठ परिसरात जाळू असा इशाराही काळे यांनी दिला. 


मतदार नोंदणी मध्ये सहज आणि सोपी प्रक्रिया असावी. पण मुंबई विद्यापीठ यामध्ये काही शिकले असे वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. वर्षभरापासून सिनेट निवडणुकीचा गोंधळ मुंबई विद्यापीठात सुरू आहे. कोर्टाने नाक कापल्यानंतर पुन्हा एकदा मतदार नोंदणी करण्याचे काम करा असं मुंबई विद्यापीठ म्हणत असल्याचे काळे यांनी म्हटले. ज्यांच्या मतदार नोंदणी मध्ये कुठले आक्षेप नाही त्यांना पुन्हा एकदा मतदान नोंदणी का करायला लावली जाते? असा प्रश्न त्यांनी केला. 


आधीची मतदार नोंदणी आहे तीच आता ठेवायला हवी. आम्ही एकूण सहा मागण्या समोर ठेवण्यात आलेल्या तीन मागण्या लेखी स्वरूपात त्यांनी मान्य केले असल्याची माहिती काळे यांनी दिली. तीन मागण्या संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू आहे. 


मुंबई विद्यापीठ हे हास्यपीठ झाला आहे. रात्रीतून निर्णय विद्यापीठ घेत असल्याची टीका अखिल चित्रे यांनी केली. मतदार नोंदणी वाढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तर अशा प्रकारची कार्यपद्धत ठेवून मतदारांमध्ये नैराश्य निर्माण करण्याचे काम विद्यापीठ करत असल्याचे त्यांनी म्हटले.