मुंबई :  मुंबईतील भांडुप  येथील  ड्रीम मॉलला (Dream Mall Fire)  पुन्हा आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र आग मोठी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, 


ड्रीम्स मॉलमध्ये मागील वर्षी 25 मार्चला आग लागली होती. यामध्ये सनराईज हॉस्पिटल मधील नऊ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा त्याच मॉल मध्ये आग लागली आहे.  मात्र सध्या आत कोणी नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


मॉल शापित प्रॉपर्टी 


 दरम्यान हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे. निर्माण झाल्यापासून तो कधीच सुरू झाला नाही. एचडीआयएल ने तो बांधला आहे. आशियातील सर्वात मोठा मॉल होता. पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे, त्यात मल्टिप्लेक्स फक्त सुरू आहे, त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यालयंही याच मॉलमध्ये आहेत, असं सांगितलं जात आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी मॉलचा सर्व्हे झाला होता.  यात 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा योग्य नसल्याचं समोर आलं होतं.  यात भांडुप येथील या ड्रीम मॉलचा समावेश होता.  


25 मार्चला लागलेल्या आगीत  11 निष्पाप रुग्णांचा मृत्यू 


भांडुप  येथील  ड्रीम मॉलला या अगोदर दुकान क्रमांक 140 मध्ये आग लागली होती आणि ही आग पसरत वरपर्यंत गेली. आगीचं मुख्य कारण डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक सर्किट सांगण्यात आलं होते. तसंच मॉलमध्ये करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम सुद्धा आग लागण्यास जबाबदार असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद केलं होते., ज्यामुळे मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुग्णालयात विषारी धूर पसरला आणि 11 निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला होता.