मुंबई : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागांत बरसतोय. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. 


अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. पुढील 24 तास मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


अंधेरी सबवे पाण्याखाली


मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगराच्या सखल भागाच्या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे येथे दीड ते दोन फूट पाणी साचल्यामुळं अंधेरी सबवे वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचे जवान अंधेरी सबवेला बॅरिकेटिंगच्या माध्यमातून बंद केला आहे. 


ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. या पहिल्या पावसाने नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमाऱ्यांच्या वाटेत अडथळा निर्माण झाला.


कोकणात काय स्थिती असणार? 


कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.