मुंबई : राज्यभरात मंदिरं उघडण्यासाठी तसेच दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे आणि भाजपकडून आंदोलनं करण्यात आली आहेत. मात्र सरकारकडून या निर्बंधात कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही. आज राज ठाकरेंनी सर्व गोष्टी सुरु असताना सणांवरच बंधन का? असा सवाल केला. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाला अटकाव घालण्यासाठी नियम पाळावेच लागतील असं म्हटलं आहे.  हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं आहे. केंद्राने देखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे,असंही मुख्यमंत्री म्हणाले.  


मुख्यमंत्री म्हणाले की, दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे.


Raj Thackeray : 'लॉकडाऊन आवडे सरकारला... सर्व गोष्टी सुरु, मग सणांवरच का येता?' राज ठाकरेंचा सरकारला सवाल 


 मुख्यमंत्री म्हणाले की, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळं नातं आहे.  त्यामुळेच शिवसेनेबद्दल  लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम आहे. पण दुर्देवाने आज 100 टक्के राजकारण केले जात आहे. त्यांनी म्हटलं की, कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण  न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे.


त्यांनी सांगितलं की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे.  त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आज प्रताप सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत, तसे करण्याची गरज आहे .  पण दुर्देवाने तेवढी प्रगल्भता  इतर काही लोकांमध्ये दिसत नाही. आपल्या बेशिस्त वागणूकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत.